दत्तवाडी, चिंचोळणे (सासष्टी): गोवा येथील श्री दत्तप्रासादिक समाज तर्फे आणि यतीन्स म्युझिक वर्ल्ड अकादमी प्रस्तुत वार्षिक श्रावणी दुसऱ्या गुरुवारी झालेल्या “स्वर ओंकार” या भक्तिमय संगीतमहोत्सवाने भक्ती, भावना आणि सुरांची अनोखी गुंफण अनुभवायला मिळाली.
मंदिरातील दीपप्रकाश, धुपाच्या सुवासात न्हालेलं वातावरण, आणि शेकडो भक्तांच्या डोळ्यांतली ओल या सगळ्यांतून स्वर ओंकार ने आपला मोहोर उमटवला. गोव्याचे लोकप्रिय युवा गायक ओंकार च्यारी यांनी आपल्या सशक्त आणि मधुर आवाजाने प्रत्येक हृदयाला स्पर्श केला. त्यांच्या गायनातली भावपूर्णता, शब्दांतील ओलावा आणि स्वरांतील तेज मंदिराच्या प्रत्येक कणात गुंजत राहिले.
यतीन तळावलीकर (तबला), आकाश जल्मी (हार्मोनियम), किशोर तेली (पखवाज) व सुमूख केणी (तालवाद्य) यांनी दिलेल्या सुंदर, सजीव आणि हृदयस्पर्शी साथसंगतीने मैफलीला दिव्यतेची नवी उंची मिळाली. निवेदन प्रदीप पंडित यांनी अत्यंत प्रभावी शब्दांनी रंगतदार केले.

संपूर्ण कार्यक्रमभर श्रोते भक्तिरसात तल्लीन झाले होते. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, तर काहींच्या ओठांवर नामस्मरण. जेव्हा शेवटी शांततेत शेवटचा स्वर गुंजला, तेव्हा सर्वत्र फक्त समाधान आणि भक्तिभावाची सुगंधी लहर पसरली होती.
शेवटी यजमान श्रीराम हृषीकेश शेणवी तळावलीकर यांनी सर्व कलाकार, मान्यवर आणि भक्तजनांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर पारंपरिक धार्मिक विधी, आरती, पालखी, पावणी आणि महाप्रसादाने सांगता झाली
